वाई प्रकल्पाची प्रथम शाखा कन्याशाळा, वाई आता शतकोत्तर वाटचाल करीत आहे. या शंभर वर्षाच्या दैदीप्यमान इतिहास आपणास समोर उलगडताना आम्हांस विशेष आनंद होत आहे. रावबहादूर गणेश रामकृष्ण उर्फ बापूसाहेब दातार व रावसाहेब मनोहर विष्णू उर्फ बापूसाहेब काथवटे या दोघांनी मिळून १९२५ साली कन्याशाळा, वाई ची स्थापना केली. महर्षी कर्वे यांच्या प्रेरणेने स्त्री शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन अवघ्या पाच मुलींना घेऊन कन्याशाळेची सुरुवात झाली. आणि वाईच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनात परिवर्तन घडून आले. काही अडचणींमुळे शाळा बंद करण्याचा विचार होता पण महर्षी कर्वे यांच्या अथक प्रयत्नातून शाळेला जीवदान मिळाले. या शाळा माऊलीची गौरवशाली परंपरा जपणारे खंबीर नेतृत्व म्हणजे माजी मुख्याध्यापिका श्रीमती. काशीताई नातू व श्रीमती. मालतीबाई देशपांडे यांचे सक्षम व्यवस्थापन व सुसंस्कारातून शाळेचा नावलौकिक वाढत गेला. या शाळा माऊलीच्या प्रांगणात वाई प्रकल्पातील आरुणि विद्या मंदिर, नवीन मराठी शाळा, कन्याशाळा, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग, बीसीए कॉलेज व्हीजन इंग्लिश मीडियम स्कूल, संपदा बेकरी बायाकर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अशा विविध आठ विभागांचे कार्य समर्थपणे सुरू आहे. या दोन्ही शाळा माऊलींची वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक विभागासाठी सर्व भौतिक सुविधांनी युक्त व सुसज्ज व स्वतंत्र इमारती भव्य क्रीडांगण, डिजिटल वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, चाळीस पेक्षा जास्त संगणक असणारा अद्ययावत संगणक कक्ष सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असलेले शाळेच्याच नव्हे तर वाईच्या वैभवात भर घालणारे साऊंड प्रूफ, उत्तम प्रकाश योजना व २०० पेक्षा जास्त असे व्यवस्था असलेले आमचे सत्यवती जोशी सभागृह याचेही यावर्षी नूतनीकरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी रंगीत बेंचेस स्मार्ट टीव्ही इत्यादी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून शाळेचे सुशोभन करण्यात आले. तसेच प्रशालेतील व परिसरातील बालिका, स्त्रिया शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी बाया कर्वे रन उपक्रम आयोजित केला जातो. संपूर्ण वाई पंचक्रोशीतून १० ते ८० वर्षापर्यंतच्या महिलांचा यात उत्साहाने सहभाग असतो.
गुणवत्ता वाढीसाठी दोन्ही प्रशालेत अनेक उपक्रम यशस्वीपणे आयोजित केले जातात. गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी संकलन केले जाते. माजी विद्यार्थिनी संघ व महर्ष कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या थोर समाज सुधारकांना ‘महर्षी कर्वे पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उन्हाळी छंद वर्ग क्रीडा शिबिर, वृक्षदिंडी, स्वच्छता अभियान, वृक्षसंवर्धन, पर्यावरण, जनजागृती, प्रभातफेरी, हस्तलिखिते, विविध स्पर्धा शाळेच्या सहली वार्षिक स्नेहसंमेलन यांचे आयोजन केले जाते. यात अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक म्हणून पात्र झाले आहेत. दोन्ही प्रशालेच्या शाळेतून मिळालेले शिक्षण व दिले गेलेले उत्तम संस्कार यामुळे अनेक विद्यार्थी उच्चविद्याविभूषित आहेत.